*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शकतो याचं नेहमीच कोडं पडायचं तिला. सगळेच त्याच्या प्रेमात. अर्थात गाऱ्हाणे सांगणारेही असंख्य. पण गाऱ्हाणेही त्यालाच सांगतात याचा अर्थ तो ते समजून घेऊन सोडवू शकतो म्हणूनच. त्याला भेटायला यायचं म्हणून एका तालात पावलं टाकणारे, त्याच्या नामाचा जयघोष करणारे वारीतले हजारो जीव बघितले कि उर दडपून जायचा एखाद्याचा. पण तो तो आहे. आपल्या अगणित लेकरांना पाठीशी घालणारा, त्यांच्या असंख्य चुका पदरात घेणारा आणि तरीही त्यांच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा. द्वारकाधीश श्रीकृष्ण. आणि ती? ती कोण मग? ती त्याची सहधर्मचारिणी. त्याची पत्नी. अर्धांगिनी. रूक्मिणी. त्याचं जगड्व्याळ रूपही स्वतःच्या मायेने सांभाळून घेणारी. जग त्याला माउली म्हणतं पण ती त्याच्या लेकराची आई. क्वचित प्रसंगी त्याचाही तान्ह्या बाळासारखा हट्ट पुरवणारी, रुसवा काढणारी. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू तसंच होतं. पण असं त्याच्याकडे बघून भागणार नाही, हा एव्हढा पसारा मांडलाय तो कोण बघेल म्हणून ती उठली. सकाळची नित्यकर्मं आवरून कामाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा कक्षात आली. तोपर्यंत तोही आवरून आलाच. तिच्याकडे पाहून छानसं हसला. आज त्याचा वाढदिवस. आत्ताच औक्षण करायला हवं. पुन्हा एकदा दिवसभर त्याचे भक्त, त्याची लेकरं जमली कि तो तिचा कुठला राहायला? तसाही तो त्यांच्यात रमला कि पुन्हा तिला कुठला सापडायला? पीतांबर, भरजरी गुलाबी शेला आणि मुकुटावर खोचलेलं ते रंगभरलं मोरपीस. तिने एकाच नजरेत सगळं न्याहाळून घेतलं आणि हातातली दुधाची कासंडी त्याच्यासमोर धरली. तो हसला, उमजल्यासारखा. “काय मग? जमलं आहे ना सगळं?” त्याने उगाच तिला चिडवायच्या हेतूने म्हटलं. “हो तर! अगदी छान! आणि काय पण विचारणं?! कुणी ऐकलं तर वाटेल जसे काही बायकोच्या अगदी आज्ञेत आहेत!” ती लटक्या रागाने म्हणाली. त्याने कासंडी तोंडाला लावली. दुधाच्या प्रत्येक घोटाबरोबर वरखाली होणारा त्याचा कंठमणी निरखत बसली ती. आज पहिल्यांदा असं होत होतं असं नाही. आजपर्यंत असंख्यवेळा तिने त्याला असं भान हरपून पाहिलं असेल. तो होताच तसा. भुरळ पडणारा, जादूगार. कासंडी रिकामी करून त्याने ती खाली ठेवली. त्याच्याकडे पाहताना तिची तंद्री लागलेली पाहून तो मनात सुखावला होता. हलकेच शेल्याच्या टोकाने त्याने आपल्या ओठावरचा दुधाचा चुकार थेंब टिपला आणि म्हणाला,