Nojoto: Largest Storytelling Platform

छत्री ☔ एका छत्रीत असतो उभे, समांतर दोघे आपण मनात

छत्री ☔

एका छत्रीत असतो उभे, समांतर दोघे आपण
मनात मात्र असतो कोलाहल, नवखे नसतो तरीपण..

आवडणारा पाऊसही, पेटून जातो  हट्टाला
कोसळताना धरणीवर, न्हाऊ घालतो मनाला..

नि:शब्द मनाचे तुषार स्पर्श करतात अलवार
वाऱ्याची झुळूक जशी बटा उडवते हळुवार..

बटांकडे रोखुन बघण्याचे धाडस काही नसते
भावनांच्या अशा खेळात वाचाही कुठे फुटते?

ती वाट बघते पाऊस रिता  होण्याची
आर्जव मी करतो वीज कडाडण्याची..🌩️

वाटतं एखादा फक्कड चहा छत्रीत मिळून घ्यावा
पण तिच्याही मनात असेल का प्रेमाचा अबोल ओलावा..

भावनांचा हा लपंडाव असाच सुरू असतो
पाऊस थांबताक्षणी छत्रीतला प्रवास संपतो..

राहतात त्या स्मृती, हृदयातील कप्पा अडवून
उफाळून कधीतरी येतात सरींसारख्या उसळून..

अमिता

©Amita
  #पाऊस