चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं. त्यातील रंगनाथचा एक मुलगा श्रीधर डॉक्टर झाला. पण तो बहिरा होता आणि दुसरा मुलगा वेडा होता. श्रीधरचं लग्न झालं. बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती. तिला कवितांची खूप आवड. रंगनाथ-शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला. उभयंतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नाव ठेवलं सुरेश! हळूहळू सुरेश मोठा होत होता. पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला. श्रीधर स्वत: डॉक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधच उपलब्ध नव्हती. अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही. शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डॉ. श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली. मग दुसर्यांदा मॅट्रिकला बसून पास झाला, तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला. तिथेही परत परीक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला. तिसर्यांदा परीक्षेला बसून तिसर्या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली. पण तीही एकामागून एक सुटतच होती. पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती ती म्हणजे जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती. समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा. मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले, कवी म्हणून तू संपलास. आता फक्त मास्तरकीच कर. पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, ते अजून ठरायचंय! १९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले. यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने ‘रंग माझा वेगळा’ हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले. बीएला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा ‘रंग माझा वेगळा’नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला. १९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.