❤️💛❤️💛❤️ तिला माफी नाही 💛❤️💛❤️💛 उपवनच्या कट्ट्यावर भयाण शांतता पसरली होती. कपल्स पॉईंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कट्ट्यावर वर्दीतल्या पोलिसांचीच गर्दी दिसत होती. संदीपच्या कॉफी कॉर्नरच्या मंद म्युझिक ऐवजी पोलिसांच्याच RT चा आवाज घुमत होता. तलावाच्या मध्यभागी दोन तीन पॅडलवाल्या बोट उभ्या तर होत्या, परंतु आज त्या बोटीत जोडप्यांऐवजी घट्ट काळ्या रंगाचा स्विमिंग सूट घातलेले पाच सहा गोताखोर होते. बराच वेळ आळीपाळीने तलावाच्या पाण्यात उड्या मारल्यानंतर शेवटी एका गोताखोराने बोटी शंकराच्या मूर्तीच्या कट्ट्याकडे घेण्याचा इशारा केला. पाण्यातच राहून पुढे जाणाऱ्या बोटीला धरत तो त्याचा सहारा घेत पुढे सरकत होता. कट्ट्याजवळ पोहचल्यावर बोटी थांबल्या. ईशारा करणाऱ्या त्या गोताखोराने बोटीत असलेला रश्शीला बांधलेला हुक हातात घेतला. डोळ्यांवरचा गॉगल नीट केला. दीर्घ श्वास घेऊन तो तलावाच्या पाण्यात शिरला. सगळेच श्वास रोखून शांत झालेल्या पाण्याकडे टक लावून पाहत होते. क्षण दोन क्षण गेल्यावर गोताखोर वर आला त्याने रश्शी खेचण्याचा ईशारा केला. ईशारा होताच बोटीतल्या दोन व्यक्तींनी हळू हळू रश्शी खेचायला सुरुवात केली. इतका वेळ गेटच्या बाहेर शांत उभ्या असलेल्या ऍम्ब्युलन्सच्या कर्कश्य आवाजाने तलावाजवळची भयाण शांतात भंगली. दोघे जण लगबगीने हातात स्ट्रेचर घेऊन भराभरा तलावाजवळ आले. मृतदेह आता पाण्याबाहेर आलाच होता. तोच आईने किंचाळी फोडली "असं कसं झालं... सोनू .... बाळा उठ ना.... का केलं असं....अग्ग्ग्ग् ??" आई घसा फोडून आक्रोश करत होती, बाबांची तर अवस्था त्याहूनही बिकट त्यांना तर रडायलाही सुचत नव्हतं. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ते जागीच बसले शून्यात नजर लावून. त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा देह आता ऍम्ब्युलन्स मध्ये ठेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. जमलेल्या नातेवाईक आप्तेष्टांनी आई बाबांना सावरले सर्वच गर्दी अँम्ब्यूलन्सच्या मागोमाग सिव्हील हाँस्पीटलला पोहचली.