का कुणास ठाऊक काही कळलंच नाही मन मात्र म्हणतंय तरुण आहे मी मात्र कसा संपला ०६ पासून ६० वयापर्यंतचा हा प्रवास काही कळलंच नाही.. काय मिळवलं काय कमावलं अन् काय गमावलं काही कळलंच नाही संपलं बालपण गेलं तारुण्य केव्हा आलं ज्येष्ठत्व काही कळलंच नाही.. काल मुलगा होतो केव्हा बाप आणि नंतर कधी अनाहुत सासरा अन् आजोबाही झालो काही कळलंच नाही केव्हा 'बाबा' चा 'आबा' होऊन गेलो हेही काही कळलंच नाही कुणी म्हणतं साठी बुद्धी नाठी कुणी म्हणतं हाती आली काठी काय खरं अन् खोटं आहे काही कळलंच नाही.. पहिले आई बापाचं चाललं मग बायकोचं चाललं मग चाललं मुलांचं या सगळ्यात मात्र माझं कधी चाललं काही कळलंच नाही माझ्या अस्तित्वाला खरंच ओळख होती का हे काही आजवर नीटसं कळलंच नाही.. बायको म्हणते आता तरी समजून घ्या वय खूप झालंय मग काय समजू व काय नको समजू का कुणास ठाऊक पण आजवर हेही मज नीट कळलंच नाही मन म्हणतंय तरुण आहे मी अन् वय म्हणतंय वेडा आहे मी मग या साऱ्या धडपडीत केव्हा खरंच गुडघे झिजून गेले अन् हल्ली तर मनही कधी थकलं हेही कळलंच नाही.. झडून गेले केस लोंबू लागले गाल लागला जाडभिंगाचा चष्मा अन् केव्हा बदलला हा माझा चेहरा काही कळलंच नाही काळ बदलला तसा मीही बदललो अन् बदलली मित्र-मंडळीही किती निघून गेले किती राहिले मित्र त्या बाबतीत देखील काही कळलंच नाही.. कालपर्यंत मौजमस्ती करीत होतो मित्रांसोबत केव्हा अनाहुतपणे हा सीनियर सिटिझनचा शिक्का लागून गेला काही कळलंच नाही पत्नी,मुलं, सून,जावई,नातू,पणतू सारा आनंदीआनंद झाला केव्हा हसलं अन् उदास हे जीवन काही कळलंच नाही.. म्हणून सांगतोय तुम्हा सर्वांना मी शब्दवेडा किशोर.. भरभरून जगून घे जीवा सारा आनंद अन् सुखदुःखही सारी उपभोगून घे मग वेळ सरल्यावर नको म्हणू की मला काही कळलंच नाही.... ©शब्दवेडा किशोर #आयुष्य_जगताना