Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9335838888
  • 145Stories
  • 7Followers
  • 1.2KLove
    495Views

उमा जोशी

  • Popular
  • Latest
  • Video
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

writing quotes in hindi तीर त्याच्या काळजाच्या पार झाला
अन् पुन्हा तो बाळ श्रावण ठार झाला

वाहण्याला त्यास ओझे साथ केली
त्याचयोगे आज श्रमसंस्कार झाला

वाजले पायातले पैंजण तिच्या अन्
काळजामध्ये कसा झंकार झाला

प्रेम त्याचे तर दिखाव्याचेच होते
गवगवा त्याचा इथे पण फार झाला

ठेवला विश्वास होता मी तुझ्यावर
का तुझ्या हातून मोठा वार झाला

तो असा सोडून गेल्यावर तिचा का
त्या क्षणाला पोरका संसार झाला

झेलले आयुष्यभर मी दुःख सारे
आज खांद्यांना सुखाचा भार झाला
--- ०४/०६/२०२४

©उमा जोशी #gazal
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

त्या पाहुन बेड्या हातामधल्या आई
का कोणाचेही अंतर द्रवले नाही
तुज सोडविण्याचा विडा उचलला आहे 
हा तुझ्याचसाठी यज्ञ मांडला आहे...१

घेतली शपथ मी मुक्त तुला करण्याची
अन दिली आहुती साऱ्या आयुष्याची 
मज विरह तुझा बघ मानवला गे नाही
आणण्या परत विनविले सागरा आई...२

धाडली पिस्तुले करुन तस्करी येथे
भय बाळगले ना गोऱ्यांचे मी तेथे
जमवली फौज मग नवतरुणांची मोठी
जे सज्ज प्राण देण्याला आईसाठी...३

अपशकुनी सन अठराशे सत्तावन्न
ती स्वप्ने झाली स्वातंत्र्याची भग्न
बंड ठरवुनी मग बासनात ते गेले
स्वातंत्र्य समर मी पुन्हा पुढे आणियले...४

मज आस नसे बघ कुठल्याही मानाची
आजन्म करावी सेवा तव चरणांची
तुज स्वतंत्र करण्या झिजली काया जेव्हा
मी पुत्र तुझा गे सुपुत्र ठरलो तेव्हा...५

भोगली सजा मी काळ्या पाण्याचीही
ना पर्वा केली कधीच जगण्याचीही 
तुज मुक्त पाहुनी झालो आनंदित मी
ना फिकीर केली भारतरत्नाची मी...६

©उमा जोशी #सावरकर
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

काळ झाला खूप त्याला खूप वर्षेही उलटली 
भूतकाळातील त्या मग ही पिढी घटना विसरली
शोध घेताना कळाले राहिले मागेच काही
ना कुणीही शोधले ते त्यात माझा दोष नाही

घात झाला रेष जेव्हा पार केली जानकीने 
सत्त्व रक्षण खुद्द केले घेत काडी मैथिलीने
रावणाचा वध करूनी राम झाला विश्वविजयी
त्यागिले सीतेस हा पण काय त्याचा दोष नाही?

हारला भावांस साऱ्या डाव लावी धर्मराजा
द्रौपदीही हारला दुर्योधनाला माज आला
याज्ञसेनी बोल लावी पांडवांची हार झाली
चूक दाखविली तिने तर त्यात काही दोष नाही! 

पाहिले ना दैन्य कोठे राजवाडा हीच व्याप्ती
भोगले ना दुःख काही रोगराई दूर होती 
एक दिवशी सामना पण दुःखदैन्याचाच झाला
मुक्त होण्या बुद्ध झाला तो तयाचा दोष नाही!
--- २९/०३/२०२४

©उमा जोशी #Hope #दोष
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

तो राबराबतो शेतामध्ये फार

अन पर्जन्याचा त्याच्यावरती वार

बीज पेरलेले वाया जाते सारे

पण गडी कधीही मानत नाही हार


थांबून राहणे माहित नाही त्याला

अविश्रांत मेहनत आलेली नशिबाला

रोवून घट्ट तो पाय उभा मातीत

कामास सज्ज जोडून बैलजोडीला 


राबतात त्याच्या कुटुंबातले सारे

झेलतात सगळे अंगावरती वारे 

थकतो जीव तरी थांबत नाही कोणी

डोळ्यांमधुनी वाहतेच पाणी खारे


भाव मिळत नाही इतके करून त्याला

तो सर्व धान्य विकतो कवडीमोलाला

धूळधाण उडते मग स्वप्नांची त्याच्या  

कष्टाने तो सावरतो आवेगाला


सगळ्या पृथ्वीचा तो असे अन्नदाता

पण क्षुल्लक किंमत येते त्याच्या हाता

हे चित्र बदलणे गरजेचे आहे ना?

एवढा करा की विचार जाता जाता

--- ३१/०७/२०२३

©उमा जोशी #शेतकरी
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

सरस्वती तू भगवति अंबे दुर्गा भवानि आई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।धृ।।

नटून थटून नेसून साड्या देवळात त्या जाती गं
कुंकू वेणी गुलाब अत्तर पूजेसाठी घेती गं 
खण अन नारळ घेउन ओटी भरते हरेक बाई गं 
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।१।।

नवरात्रीला भजन आरत्या नऊ दिवस अन राती गं
भोंडल्या सवे गरबा रंगे तुझिया सेवेसाठी गं
तुझ्या दर्शने सगळा थकवा पळून माझा जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।२।।

कलियुगामध्ये ठायी ठायी असूर दानव दिसती गं
प्रत्येकीला करण्या रक्षण सत्वाचे दे शक्ती गं
तुझ्या कृपेने अवघे संकट रसातळाला जाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।३।।

अखंड महिमा मुखी जगाच्या अंबे गाजत राही गं
त्रिदेवसुद्धा तुझी जगाला सांगत असती महती गं
कृपाप्रसादे सर्व जगाला सुखी ठेव तू बाई गं
भक्तांच्या रक्षणास सत्वर धावत येसी आई गं ।।४।।
---१८/१०/२०२३ @१२:१५

©उमा जोशी #navratri #धावा #हरिभगिनी
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

रोज सकाळी तुझी आठवण येते आई

निघून जाण्याची अंमळ तू केली घाई

सहवास तुझा अजून वाटे हवाहवासा

तुझ्या विना गे एकाकी मी पडले बाई


सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी तुला सांगणे

निरागस जणू होते माझे असे वागणे

मला आवडे ऐकण्यातली एकतानता

आणि तल्लीन सांगण्यातले माझे होणे


उत्तर नव्हते तुझ्याकडे सगळ्या प्रश्नांचे

तरी कधी ना टाळलेस तू ऐकायाचे

सांगून तुला सारे काही मी निश्चीन्त

हलके हलके संवादातुन वाटायाचे


आज पुन्हा उद्विग्न असे मन पण तू नाही

मी एकाकी सोबत माझ्या कोणी नाही

सांगशील तू काय? आठवत बसले आहे

अनेक मिळती पर्याय मला पण सुचे न काही


किती सावरू तरी नावरे मनातले कढ

ठरे भावना इथे बये बुद्धीच्या वरचढ

क्षणाक्षणाला प्रसंग मोठे उभे ठाकती

तुला स्मरूनी चालत आहे वाटा अवघड

©उमा जोशी #navratri  #आई #अनलज्वाला
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

आजही जिथे स्त्री सुरक्षित नाही
तिथे कसं म्हणावं "समाज प्रगत आहे"

पदोपदी अवहेलना झेलत लढत ती जगतेय
आजही तिच्या वस्त्राला हात घालण्यात पुरुषार्थ वाटतोय
बाई तुलाच व्हावे लागेल सज्ज आता
कलियुगात कुठला राम आणि कुठला कृष्ण

वर्चस्व दाखविण्यासाठी दुसऱ्यावर 
खच्चीकरण मात्र त्यांच्या स्त्रीचे
का? 
बांगड्या भरल्यात का हातात?
लढा स्वतःच्या योग्यतेच्या जथ्यासोबत
पण नाही, तुम्ही फक्त स्त्रीलाच नागवणार

का? तर ती सहन करेल, रडेल, भेकेल 
आणि मग गप्प बसेल
तिच्या समाजावर आपला वचक बसेल
तद्दन असुरी वृत्तीने वागणार अजूनही तुम्ही
आपली छाती ठोकून करणार पुकारा
आपल्या नपुंसक विजयाचा

अजूनही कोपऱ्यात कुठेतरी कोणीतरी
असेल आसवे गाळत बसलेली
तिच्यावरच्या अन्यायाला फुटणाऱ्या वाचेची वाट बघत
पण त्याने कोणाचा काय फायदा यावर ती वाचा
फुटेल की नाही हे ठरणार आहे
बये तूच हो समर्थ आता, स्वतःच्या रक्षणाला
नको बघू वाट कोण्या रामाची किंवा कोण्या कृष्णाची
तूच बन तुझी कृष्ण आणि तूच बांध दुसरीच्या जखमेवर चिंध

©उमा जोशी #स्त्री
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

सुखामागुनी पळती सारे आणिक भुलती ऐश्वर्याला
माणुसपण परि जीव सोडते जगात येथे क्षणाक्षणाला ।।

तारुण्याची असते झापड दाट गुलाबी डोळ्यांवरती 
वयाबियाचा हिशेब नसतो उद्धट वाणी ओठांवरती
सरून जाते जिथे तरुणपण तिथे तयाचा माज कशाला
माणुसपण परि जीव सोडते जगात येथे क्षणाक्षणाला ।।

वेळच नसतो बोलायाला खेळायाला मुलांसंगती
अडकुन बसले सगळे जगणे घड्याळ्यातल्या काट्यांभवती
वृद्ध बाप अन आई बघते वाट मुलाशी बोलायाला
माणुसपण परि जीव सोडते जगात येथे क्षणाक्षणाला ।।

निघून जाती क्षण सौख्याचे मुठीतल्या त्या वाळुसारखे
होतो आपण आपल्याच मग मुलालेकरांनाही परके
एकांताची शिक्षा भोगत बोल लावतो का नशिबाला
माणुसपण परि जीव सोडते जगात येथे क्षणाक्षणाला ।।

बघता बघता सरतो अवघा अपुल्या आयुष्याचा  खेळ
आईबाबा मुले बायको कधी कुणा ना  दिधला वेळ
संध्यासमयी आयुष्याच्या मनात सलतो घाव एकला
माणुसपण परि ओळखले मी  जीवन सरणाऱ्याच क्षणाला।।
-- १८/०७/२०२३ @ २२:५०

©उमा जोशी #माणुसपण
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

तरुणाई मोठी धीट भुलणार नाही आता
मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा

खोट्या वचनांची गाडी चालणार आता नाही
श्राद्ध घालतील जर बाप दाखविला नाही
तंत्रज्ञान ज्यांच्या हाती करतील सारे त्रागा
मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा

किती रेटणार तुम्ही स्वप्ने प्रगतीची खोटी 
पूर्ण करण्याला स्वप्ने इच्छा पडते का थोटी?
पूर्ण करुनी वचने मग नक्की मते मागा
मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा

नाही साऱ्यांना मिळत अन्न वस्त्र निवाराही
भूक दैन्य साचलेले घराघरातून राही
काम देऊन हातांना विचारांची गाथा सांगा
मतदार झाला सज्ज दाखवील "त्यांना" जागा

कोणतीही असो पार्टी कोणताही असो पक्ष
व्हावा विकास देशाचा हेच असो त्यांचे लक्ष्य
देशभरात वाहू दे विकासाची चंद्रभागा
सज्ज मतदार मग देई सिंहासनी जागा
२६/ ०६/ २०२३ @१३:००

©उमा जोशी #मतदार
406ee6337cba0c75eabd47a18f5fb3f6

उमा जोशी

निजलेल्या देहावरती
उबदार घातली चादर
आईची दृष्टी निश्चल
अश्रूंचा नयनी सागर

सांत्वनास कोणी येती 
ती दिसता जाती गोठुन
ती मूक उसासे घेई
तोंडास पदर लावून

विश्वास तिला ना आता
दैवाचा वाटे काही
म्हातारपणाची काठी
दुसरी उरली ना काही

सोडून मला का गेला
अवचित घाईने पुढती
राहिला पसारा मागे
डोक्यात वादळे उडती

वय काय असे जाण्याचे
बसली जोडाया मेळ
ताळा नाही तो जमला
संपला घडीचा खेळ

पोकळ सगळे ते शब्द
पोकळ सारी ती वचने
मुलगा आधी गेलेल्या
आईचे निष्फळ जगणे
१५/०६/२०२३ @१६|४०

©उमा जोशी #निष्फळ_जगणे #आई #उद्धव_वृत्त
loader
Home
Explore
Events
Notification
Profile