अरे कोसळणाऱ्या पावसा बात माझी ऐकून ठेव. येणाऱ्या नक्षत्रांसाठी आभाळ थोडं राखून ठेव. भरले नदी-नाले, तुडुंब भरल्या बावडी पुराच्या वेढ्यात, बुडाली गावची चावडी ह्या बेभान स्वैर सरींना लगाम थोडं लावून ठेव. येणाऱ्या नक्षत्रांसाठी आभाळ थोडं राखून ठेव. भिजले सारे रानमाळ, गारठली पाखरे चाऱ्यासाठी दावणीस, हंबरती वासरे असं घरट्यात पाखरांना नको उपाशी डांबून ठेव. येणाऱ्या नक्षत्रांसाठी आभाळ थोडं राखून ठेव. एका रातीत झाली, संसारांची होळी प्रश्न सुटण्याआधी भाकरीचा विझल्या चुली कोणाच्या ओसरीवरी लेकरं बाळं नेवून ठेव. येणाऱ्या नक्षत्रांसाठी आभाळ थोडं राखून ठेव. आज उरले ना अंगण, उरली ना शेजारे पुरात कालच्या सारी उध्वस्त झाली घरे डोळ्यांमधील अश्रु कसे काळजामध्ये गाडून ठेव. येणाऱ्या नक्षत्रांसाठी आभाळ थोडं राखून ठेव. सरता पावसाळा, हे कोरडे नदी-नाले हंडाभर पाण्यासाठी, झिजतात पाऊले दुष्काळाच्या भेगा साऱ्या काळजावर रेखून ठेव. येणाऱ्या नक्षत्रांसाठी आभाळ थोडं राखून ठेव. एकलव्य